Friday, 17 July 2015

वन रँक वन पेन्शन संबंधी पंतप्रधानांना पत्र...

प्रति,
मा. श्री नरेंद्र मोदी जी,
पंतप्रधान, भारत सरकार,
साउथ ब्लॉक, राईसिना हिल्स,
नवी दिल्ली.

विषय- शहीद जवानांच्या विधवा पत्नी व सैनिकांसाठी ‘वन रँक वन पेन्शन’ योजना कार्यान्वित करण्याविषयी 2 ऑक्टोबर 2015 पासून रामलिला मैदानावर उपोषण करण्याविषयी...

महोदय,
उपरोक्त विषया संबंधाने मी या अगोदर 7 जुलै 2015 रोजी पत्र लिहिले होते. परंतु आपल्या कार्यालयाकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. निवडणूकीच्या वेळी आपण अनेकदा आश्वासन दिले होते की, आमचे सरकार सत्तेवर आल्यास आम्ही ‘वन रँक वन पेन्शन’ योजना अंमलात आणू. आपल्या पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यातही तसे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आपले सरकार सत्तेवर येऊन आता वर्ष उलटून गेले आहे. अद्याप पर्यंत आपण त्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही.
26 फेब्रुवारी 2014 रोजी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या सैनिक कल्याण विभागातर्फे संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि संरक्षण सचिव, भूदल, वायूदल आणि नौदलाचे प्रमुख, संबंधित मंत्रालयाचे सचिव या सर्वांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
‘वन रँक वन पेन्शन’ या मुद्द्यावर काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने 16 फेब्रुवारी 2015 रोजी सरकारला आदेश दिले होते की, तीन महिन्यांच्या आत ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करण्याविषयी निर्णय घेण्यात यावा. परंतु त्याचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू न केल्यामुळे कित्येक निवृत्त सैनिकांवर अन्याय होत आहे. त्यांना अत्यल्प पेन्शनमध्ये जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे हे निवृत्त सैनिक समाजात सन्मानाने जगू शकत नाहीत. जो सैनिक शहीद होतो त्याच्या विधवा पत्नीला केवळ 3500 ते 4500 रुपये पेन्शन मिळते. अशा ज्या विधवा भगिनींना एक किंवा दोन मुले आहेत, त्यांचे शिक्षण आणि जीवनावश्यक गरजा या महागाईच्या दिवसांत इतक्या कमी पेन्शनमध्ये कशा भागणार? परिणामी अशा शहीदांच्या विधवा पत्नींना समाजात सन्मानाने जगणे कठीण होऊन गेले आहे. अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागते. देशाचे संरक्षण करण्यासाठी आमच्या जवानांना लेह-लडाख सारख्या बर्फाळ प्रदेशात रहावे लागते. अनेक प्रकारचे कष्ट सोसल्यानंतर जेव्हा हे जवान निवृत्त होतात तेव्हा अशा प्रकारे अत्यल्प पेन्शन मिळत असल्याने त्यांना अत्यंत हालाखीचे जीवन जगावे लागते. देशासाठी आपले कर्तव्य बजावत असताना ज्या जवानांना कायमचे अपंगत्व येते त्यांना उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने जगता यावे यासाठी त्यांना नियमित पेन्शन आणि बोर्ड पेन्शन असे दोन्ही लाभ मिळायला हवेत. कारण समाज व देशासाठी त्यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे.
मी यापूर्वीच्या पत्रातही लिहिले आहे की, संसदेत निवडून गेलेल्या खासदारांना रेल्वेचा फर्स्ट क्लास, विमान प्रवासाचे भाडे, वीज, फोन, निवास अशा अनेक सुविधा मिळतात. याशिवाय महिना 50 हजार वेतनही मिळते. तरीही ते महिना एक लाख वेतनासाठी आग्रह धरीत आहेत. परंतु 30/32 च्या वयात आमच्या काही भगिनी विधवा होतात त्यांना मात्र 3500 ते 4500 एवढीच पेन्शन मिळते. ही बाब सामाजिक दृष्टिने योग्य नाही.
देशातील शेतकऱ्यांचा भूमि अधिग्रहण विधेयकाला विरोध असताना, राज्यसभेतही विरोध असताना सरकारकडून तीन वेळा अध्यादेश जारी केला जातो. परंतु अनेक वेळा आश्वासने देऊनही ‘वन रँक वन पेन्शन’ बाबत मात्र सरकार निर्णय घेऊ शकत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. दिल्लीच्या जंतरमंतर वर निवृ-त्ती वेतन धारक सैनिकांचे ‘वन रँक वन पेन्शन’ च्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. त्यांची सरकारकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही. ही बाब चांगली नाही.
देशातील कित्येक शेतकरी संघटना आणि युनायटेड फ्रंट ऑफ एक्स सर्विस मन, पेन्शनगर जनाव संघटन अशा अनेक संघटनांचे लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी सैनिक व विधवा यांच्या समस्यांविषयी मला सांगितले. अशा परिस्थितीत आपण आंदोलनात उतरावे अशी विनंती केली. मीसुद्धी एक पेन्शनर निवृत्त सैनिक असल्याने मी ठरवले की, ‘वन रँक वन पेन्शन’ म्हणजेच शहीद जवानांच्या विधवा पत्नी म्हणजेच आमच्या भगिनींच्या समस्या सोडविण्यासाठी या आंदोलनात उतरण्याशिवाय पर्याय नाही.
26 जुलै 2015 रोजी दिल्ली येथील जंतरमंतर वर कारगील विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमात शहीदांच्या विधवा पत्नींचा उचित सन्मान करण्यात येणार आहे. तसेच देशाचे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री ज्यांनी या देशात ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिला होता. त्याची आठवण ठेवून देशातील जवान आणि शेतकरी यांच्या प्रश्नांबाबत लोकशिक्षण व लोकजागृतीसाठी देशातील प्रत्येक राज्यात सभा घेतल्या जातील. या देशव्यापी दौऱ्याच्या तपशीलवार कार्यक्रमाची 26 जुलै रोजी जंतरमंतर येथे होणाऱ्या कार्यकर्मात अधिकृत घोषणा करण्यात येईल.
ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधित प्रत्येक राज्यात सभा होतील. या सभांमधून पुढील रामलिला मैदानावरील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2015 रोजी महात्मा गांधी आणि ‘जय जवान जय किसान’चा नारा देणार लाल बहादूर शास्त्री या महापुरुषांच्या जयंतीच्या मुहूर्तावर दिल्लीच्या रामलिला मैदानावर माझे उपोषण सुरू होईल. यामध्ये ज्यांना वाटते की, या मागण्या योग्य आहेत असे देशातील सर्व पेन्शनधारक सैनिक, शहीद जवानांच्या विधवा पत्नी हे सर्वजण या आंदोलनात सहभागी होतील. मग जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.
जे पेन्शनधारक सैनिक रामलिलावर येऊ शकणार नाहीत त्यांनी आपापल्या तालुक्यात, जिल्ह्यात आंदोलन करावे. ज्यावेळी हे सैनिकांचे आंदोलन होईल त्यावेळी शेतकऱ्यांनी त्याला पाठिंबी द्यावा आणि ज्यावेळी भूमि अधिग्रहणच्या विरोधात आंदोलन होईल तेव्हा त्यास सैनिकांनी पाठिंबा द्यावा. जय जवान, जय किसान.
विविध राज्यात ज्या सभा होतील व रामलिला मैदानावर जे आंदोलन होईल त्यात कोणत्याही राजकीय पक्ष-पार्टीचा झेंडा असणार नाही. मंचावर कोणताही राजकीय नेता असणार नाही. हे आंदोलन केवळ सैनिक व शेतकऱ्यांचे असेल.
‘वन रँक वन पेन्शन’, शहीदांच्या विधवांना पूर्ण पेन्शन मिळावी, ज्या सैनिकांना कमी पेन्शन मिळते त्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशा आमच्या मागण्या राहतील. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशा परिस्थितीत शहीदांच्या विधवा आणि इतर सैनिकांना तोकड्या पेन्शनमध्ये आपल्या जीवनावश्यक गरजा भागवाव्या लागत आहेत. मी ‘वन रँक वन पेन्शन’ चा प्रश्न व भूमि अधिग्रहण बील या संबंधी यापूर्वी केंद्र सरकारला अनेक वेळा पत्र लिहिले आहे. पण सरकारकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. नाइलाजाने मला आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागत आहे. देशात सैनिकांच्या विविध संघटना आहेत तसेच शेतकऱ्यांच्याही विविध संघटना आहेत. त्यातील अनेक संघटनांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे आंदोलनाला यश मिळत नाही. सैनिक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वांना संघटित होऊन संघर्ष करावा लागेल.
मी माझ्या जीवनात या हे केले आहे म्हणून सर्वांना सांगत आहे. जीवनात करोडो रुपयांच्या योजना राबविल्या पण एक रुपयाचाही बँक बॅलन्स ठेवला नाही. देश-विदेशातून मला कोटीहून अधिक रुपयांचे पुरस्कार मिळाले, त्याचा ट्रस्ट करून वर्षभरात व्याजापोटी येणाऱ्या दहा बारा लाख रुपयांचा समाजासाठी उपयोग करतो. आज माझ्याकडे केवळ झोपण्याचे बिस्तर आणि जेवणाचे ताट आहे. याशिवाय काहीही ठेवलेले नाही. मंदिरात राहतो. पण करोडपतीला मिळत नसेल एवढा आनंद अनुभव करतो. अण्णा हजारे यांच्याप्रमाणे सर्वांनी वागावे असे मी म्हणणार नाही. परंतु, जवान आणि किसान यांच्या हितासाठी काम करू इच्छिणाऱ्या सर्व संघटनांनी सेवेचा आदर्श निर्माण करायला हवा. जय जवान जय किसान आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व संघटनांनी आर्थिक व्यवहार करताना पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे.

धन्यवाद,

कि. बा. तथा अण्णा हजारे.

No comments:

Post a Comment