Wednesday, 23 September 2015

स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज...

लाखो लोकांच्या बलिदानानंतरही देशात खरे स्वातंत्र्य आले नाही. 
त्यासाठी स्वातंत्र्यासाठी दुसरी लढाई लढावी लागणार...

इंग्रजांचा जुलुम, अन्याय, अत्याचार सहन करण्याची देशातील जनतेची सहनशिलता संपल्यामुळे जुलमी इंग्रजांना देशातून घालविण्यासाठी आणि देशात लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही येण्यासाठी 1857 पासून इंग्रजांना घालविण्यासाठी देशातील जनतेने स्वातंत्र्याचे युद्ध सुरु केले. नव्वद वर्षाच्या प्रदीर्घ लढाई नंतर 1947 साली इंग्रजांना आपल्या देशातून जाव लागल. त्यासाठी शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारख्या लाखो लोकांनी आपल्या प्राणाच बलिदान केले. अनेकांनी सशक्त कारावास भोगले, भूमीगत राहून अनंत हाल अपेष्ठा सहन केल्या. तेव्हा कुठे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
1947 साली इंग्रज या देशातून गेला मात्र लोकांची लोकांनी लोक सहभागातून चालविलेली लोकशाही यायला हवी होती ती लोकशाही मात्र स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतर ही देशात आली नाही. तोच भ्रष्टाचार, तिच लुट, तोच दहशतवाद, तिच गुंडगिरी घडल काय इंग्रज जाऊन? फक्त गोरे गेले आणि काळे आले एवढाच फरक दिसतो आहे. पक्ष आणि पार्टीशाहीनी लोकशाहीला देशात येऊच दिले नाही. 1949 साली भारतरत्न आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची सुंदर घटना तयार केली. त्या घटनेमध्ये पक्ष आणि पार्ट्याचे नाव कुठेच नाही. 26 जानेवारी 1950 साली आमच्या देशात प्रजासत्ताक आले. प्रजा या देशाची मालक झाली . ज्या दिवशी जनता या देशाची मालक झाली त्याच दिवशी तत्कालीन चालत आलेल्या घटनाबाह्य पक्ष आणि पार्ट्या बरखास्त व्हायला हव्या होत्या. महात्मा गांधीजींनी कॉँग्रेस वाल्यांना सांगितले होते देशात प्रजासत्ताक आले, जनता देशाची मालक झाली. आता कॉंग्रेस पार्टी बरखास्त करा. कारण आमच्या घटनेमध्ये पक्ष आणि पार्ट्यांचे नाव कुठेही आलेले नाही.
आमची घटना असं म्हटते आहे कि भारतामध्ये राहणारा कोणीही भारताचा नागरिक ज्याचे वय 25 वर्षे आहे असा चारित्र्यशिल वैयक्तीक माणूस लोकसभेची निवडणूक लढवू शकेल आणि ज्यांच वय 30 वर्षे झाले आहे असा माणूस वैयक्तिक राज्यसभेची निवडणूक लढवू शकेल. घटनेमध्ये पक्ष आणि पार्ट्यांचे नाव नसल्याने पक्ष आणि पाट्यार्ंंच्या समुहाला घटनेप्रमाणे निवडणूक लढविता येत नाही.
स्वातंत्र्यानंतर देशात 1952 साली पहिलीच निवडणूक झाली त्या वेळी पक्ष आणि पार्ट्या बरखास्त झाल्याच नाहीत या उलट पक्ष आणि पाट्यार्ंनी पक्ष आणि पार्ट्यांना घटना मान्यता देत नसताना घटनाबाह्य निवडणूका लढविल्या. वास्तविक पाहता तत्कालीन निवडणूक आयोगाने या निवडणूकांवर आक्षेप घ्यायला हवे होते. ते त्यांनी न घेतल्यामूळे 1952 पासून आजतागायत पक्ष आणि पार्ट्यांंच्या घटनाबाह्य निवडणूका चालू आहेत.
      पक्ष आणि पार्ट्यांच्या निवडणुकामुळे पक्ष-पार्ट्यांमधे सत्ता स्पर्धा वाढत गेल्या. सत्तास्पर्धामुळे आपला पक्ष येन-केन प्रकारे निवडून यावा आणि सत्ता आपल्या हाती असावी यासाठी उमेदवार गुंड आहे, भ्रष्टाचारी आहे, लुटारु आहे, दहशतवादी आहे हे पार्टीच्या लोकांना माहित असतानाही त्यांच्या मागे फक्त मतांचा गठ्ठा आहे म्हणून त्यांना निवडणूकीचे तिकीट देणे सुरु झाले आणि संसदेसारख्या एका पवित्र मंदिरामध्ये हळुहळु गुंड, भ्रष्टाचारी, लुटारु, दहशतवादींची संख्या वाढत गेली. आज लोकसभेसारख्या पवित्र मंदीरामध्ये 170 पेक्षा अधिक लोक दागी गेले आहेत हा लोकशाहीला गंभीर धोका आहे.
      पक्ष आणि पार्टी विरहीत चारित्र्यशिल वैयक्तिक उमेदवार संसदेमध्ये जाण्याऐेवजी पक्ष आणि पार्ट्यांचे समुह संसदेसारख्या पवित्र मंदिरात गेल्याने पार्ट्यांचे संसदेत ही समुह झाले आणि बाहेर समाज्यामध्ये ही समुह तयार झाले. पक्ष-पार्टी विरहीत जनतेने आपले प्रतिनिधी निवडून लोकसभेत गेले असते तर ती खर्‍या अर्थाने लोकांची सभा झाली असती. मात्र पक्ष-पार्ट्यांचे लोक लोकसभेत गेल्यामूळे ती लोकसभा न रहाता पार्ट्यांची सभा झाली.
      स्वातंत्र्यानंतर अशा पक्ष आणि पार्ट्यांच्या समुहामुळे देशात भ्रष्टाचार वाढत गेला. पक्ष आणि पार्ट्यांच्या समुहामुळे देशात जाती-पाती, धर्म, वंशभेद निर्माण होऊन आप-आपसात भांडण-तंटे निर्माण झाले. महात्मा गांधीजीं म्हणत होते देशाचा खर्‍या अर्थाने सर्वांगिण विकास करण्यासाठी खेड्यांचा विकास होणे आवश्यक आहे. खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा खर्‍या अर्थाने विकास होणार नाही. आज देशातील अधिकांश खेड्यांमध्ये पक्ष आणि पार्ट्यांच्या समुहाने आप- आपले गट-तट निर्माण केले त्यामुळे खेड्याच्या विकासाला खिळ बसली. पर्यायाने देशातील विकासाला खिळ बसली.
      आपल्या पक्षाला निवडणूकीमध्ये पैशांची गरज असते म्हणून पक्ष आणि पार्ट्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आहे की विस हजार (20,000/-) रुपये पर्यंत ज्या देणग्या पार्टीला मिळतात त्याचा हिशेब देण्याची गरज नाही. आज लाखो रुपयांचे डोनेशन काही पार्ट्या घेतात त्याचे विस हजाराचे तुकडे करतात आणि बिगर हिशेबी मिळणारा देणग्यांचा काळा पैसा आपल्याच देशात काही पक्ष आणि पार्ट्या पांढरा करण्याचे काम करतात. पक्ष आणि पार्ट्यांना मिळणार्‍या देणगीच्या एक-एक रुपयाचा हिशेब पक्ष आणि पार्टींनी द्यायला हवा. त्यांचे स्पेशल ऑडिट व्हायला हवे मात्र ते होत नाही.
      आपल्या देशात टू जी स्पेक्ट्रम, बोफोर्स, हॅलिकॉप्टर, कोळसा, व्यापम सारखे कोट्यावधी रुपयांचे घोटाळे होतात हे पक्ष आणि पार्ट्यांच्या समुहामुळे होतात. घटनेप्रमाणे पक्ष आणि पार्टी विरहित वैयक्तिक जनतेचा उमेदवार निवडून गेला असता तर हे करोडो रुपयांचे घोटाळे झाले नसते. भ्रष्टाचार, गुंडगिरी, लुट वाटली नसती. त्यासाठी 2011 पासून आम्ही लोकशिक्षण लोकजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. 2012, 2013 मध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा सहा राज्यात पांच महिने दौरे केले. तीन हजार (3000) किलोमीटर प्रवास करुन पाच महिन्यात तिनशे सभा घेतल्या. या देशात लोकशाही आणायची असेल तर जो पर्यंत पक्ष आणि पार्टीतंत्र नेस्तनाबुत होणार नाही तो पर्यंत देशात लोकशाही येणार नाही. याचा प्रचार प्रसार केला. याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. जनतेला ही बाब पटते आहे. देशाचे निवडणूक आयोगा बरोबर चार वेळेला बैठका झाल्या. निवडणूक आयोगाला आमचे म्हणणे हेच होते की घटनेमध्ये पक्ष आणि पार्टींचा उल्लेख नाही मग तुम्ही पक्ष आणि पार्ट्यांना मान्यता देता कशी? त्या  वेळी निवडणूक आयोगाने चांगला प्रतिसाद दिला.
घटनेप्रमाणे किंवा वैयक्तिक उभा असलेला चारित्र्यशिल उमेदवार अशा जनतेच्या चारित्र्यशिल उमेदवारालाच आयोगाने मान्यता द्यायला हवी. पक्ष आणि पार्टीच्या उमेदवाराला नव्हे. ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनाला आणून देण्याचा प्रयत्न केला. या लढाईसाठी उत्तर प्रदेश मध्ये लोकतंत्र मुक्ती आंदोलन नावाने एक आंदोलन उभे झाले आहे. मध्यप्रदेश, उत्तराखंड मध्ये मोठ्‌या प्रमाणावर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या काही वर्षाच्या या आंदोलनाला आज पन्नास टक्के यश मिळाले आहे.
लोकतंत्र मुक्ती आंदोलनाच्या आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एक चांगाल निर्णय घेतला आहे. यापुढे निवडणूकांमध्ये फक्त पक्ष आणि पार्ट्यांचे चिन्ह न वापरता उमेदवारांचे फोटो वापरण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. म्हणजेच उमेदवाराचे फोटो हे जनतेचे उमेदवार आहेत. मात्र सदर फोटोच्या पुढे निवडणूक आयोगाने उमेदवाराचे चिन्ह ही दिले आहे. दिनांक 18 सप्टेंबर 2015 रोजी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे कि घटना पक्ष आणि पार्टीला मानत नाही तर उमेदवाराच्या फोटोच्या समोर जे घटनाबाह्य पार्टीचे चिन्ह दिले आहे ते चिन्ह काढून टाका. उमेदवाराच्या फोटो समोरचे पक्ष आणि पार्ट्यांचे चिन्ह काढून टाकल्यास मतदारांच्या समोर जे उमेदवाराचे फोटो असेल ते सर्व घटनेप्रमाणे जनतेचे उमेदवाराचे फोटो असतील.
आता येणार्‍या निवडणूकामध्ये मतदार उमेदवारांच्या फोटो मधील फक्त चारित्र्यशिल माणसांच्या फोटोसमोरचे बटन दाबतील किंवा शिक्का मारतील. यामुळे घटनाबाह्य पक्ष आणि पार्ट्यांचे चिन्ह असणार नाही. त्यामुळे फोटो मधील दिसणार्‍या चारित्र्यशिल उमेदवाराला पाहून मतदार जनतेने उभा केलेला किंवा वैयक्तिक उभा असलेल्या उमेदवाराला मतदान करतील आणि जस-जसी लोकजागृती होईल तशी पक्ष आणि पार्टीतंत्र नेस्तनाबुत होत जाईल व एक दिवस मतदार आपल्या देशात घटनाबाह्य पक्ष आणि पार्टीतंत्र नेस्तनाबुत करुन लोकंाची, लोकांनी, लोकसहभागातुन चालविलेली लोकशाही आणू शकतील. घटनाबाह्य पक्ष आणि पार्ट्यांचे चिन्ह निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या फोटो समोरुन न काढल्यास स्वातंत्र्याची दुसरी लढाई समजून जनतेला अहिंसेच्या मार्गाने लढाई लढावी लागणार आहे.
      ज्यांना वाटत कि 1857 ते 1947 या नव्वद वर्षात देशात लोकशाही यावी म्हणून लाखो शहिदांनी बलिदान केले त्या शहिदांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आता फक्त गरज आहे या देशात लोकशाही यावी अशा समविचारी माणसांनी एकत्र येण्याची. स्वातंत्र्याच्या 68 वर्षात लोकशाहीला पक्ष आणि पार्टीतंत्रांनी आपल्या देशात येऊच दिले नाही. ती लोकशाही येण्याचा मार्ग आपल्या घटनेप्रमाणे निवडणूक आयोगाने जनतेच्या दबावामुळे काही प्रमाणात आपणाला मोकळा करुन दिला आहे. आता गरज आहे देशातील समविचारी माणसांनी एकत्र येण्याची. कारण ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे.
पहिल्या स्वातंत्र्याच्या लढाईला 1857 ते 1947 नव्वद वर्षे लागले. लाखो लोकांना बलिदान कराव लागले. या लढाईला एवढी वर्षे लागणार नाही पण किमान 10 ते 12 वर्षे लागतील. मात्र कोणालाही बलिदान करण्याची वेळ येणार नाही. मात्र धरणे, मोर्चे, उपोषण, जेलभरो अशी आंदोलने करावी लागतील. गावां-गावांत जनतेला जागृत करावे लागेल. स्वातंत्र्याच्या या दुसर्‍या लढाईमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हायला हवे।
जय हिंद। भारत माता की जय।

आपला,


कि. बा. तथा अण्णा हजारे

1 comment:

  1. IF Anna Hazare is not with the people then it is very unfortunate for him ..

    09871966707
    guitaruncle@gmail.com
    4c/16,Old Rajinder Nagar,
    New Delhi

    "World Against God"
    SUSHIL AHUJA

    ReplyDelete