दि. 27 फेब्रुवारी
2014
आज पर्यंत जीवनात कोणत्याही पक्ष
आणि पार्टीला मी जाहीर पणे पाठिंबा व्यक्त केलेला नसल्याने, पहिल्यांदाच
ममता बॅनर्जी यांना पाठिंबा व्यक्त केल्यामुळे अनेक लोक प्रश्न विचारायला लागले आहेत
कि, पक्ष आणि पार्ट्या घटनाबाह्य निवडणुका लढवित आहेत असे आपण
म्हणत आलात, मग या वेळी एका पार्टीला आपण पाठिंबा व्यक्त केला
याचे कारण काय? त्याचे कारण असे आहे कि, 2014 ची निवडणुक म्हणजे देशातील बदल होण्याचा टर्निंग पॉईंट आहे. देशात वाढता भ्रष्टाचार, महागाई, अन्याय, अत्याचार वाढत चालल्या मुळे देशातील जनता परिवर्तनाचा
विचार करीत आहे. अशा अवस्थेत अनेक वर्ष ठराविक पार्ट्याच या देशाचे
नेतृत्व करीत आलेल्या आहेत. या पार्ट्या देशाला उज्वल भविष्य
देऊ शकणार नाहीत.म्हणुन देशातील जनता वेगळा पर्याय कसा देता येईल
असा विचार करीत आहे. देशातील मतदारांनी देशात बदल घडवून आणण्याचे
ठरविले तर अशक्य नाही. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ममता बॅनर्जी आर्थिक दृष्ट्या गरीब आहे तर इतर पार्ट्यांच्या तुलनेत त्यांची
पार्टीही गरीब आहे. मी कुठेही बँक बॅलन्स ठेवलेला नाही पण दोघांनाही
देशा बद्दल तळमळ असल्याने हा प्रयत्न करीत आहोत. देशात बदल घडवून
आणण्यासाठी आम्ही 17 मुद्दे असणारे पत्र देशातील सर्व पक्ष आणि
पार्ट्यांना लिहून विचारणा केली होती कि, या पत्रातील
17 मुद्द्यांची आपण अंमल बजावणी करायला तयार आहात
का? या 17 मुद्द्यांची
अंमल बजावणी झाली तर या देशाचे चित्र बदलुन जाईल. असा आम्हाला
विश्वास वाटतो. पण एकाही पक्ष आणि पार्ट्यांनी आम्हाला उत्तर
दिले नाही. फक्त ममता बॅनर्जींनी पत्र पाठवून कळविले कि,
मी आणि माझी पार्टी सत्तेत आली तर ह्या 17 मुद्द्यांची अंमल बजावणी करण्यास तयार आहे. मी ममता बॅनर्जी
विषयी अधिक माहीती घेतली असता पश्चिमबंगालच्या मुख्यमंत्री असुनही सरकारचा बंगला घेतला
नाही, गाडी घेतली नाही, कोणताही पगार घेतला
नाही. स्वताःच्या वडिलोपार्जित लहानशा घरा मधे रहाते.
आजही हवाई चप्पल वापरते. खादीची साडी वापरते.
हा जो त्याग केला आहे. तो सामाजिक आणि राष्ट्रीय
दृष्टीने मला महत्वाचा वाटतो. समाज आणि राष्ट्रहितासाठी अन्याय,
अत्याचाराच्या विरोधात सारखी लढत आलेली आहे. डोक्यामध्ये
मार खाऊऩ 65 टाके पडलेले आहेत. हात फॅक्चर
झाले, पाय फॅक्चर झाले तरी सुद्धा ती बाई समाज हितासाठी सारखी
लढते आहे. देशात एक मुख्यमंत्री म्हणून समाज व राष्ट्र हितासाठी
एवढा मार खाणारा मुख्यमंत्री कोणी दुसरा दिसून येत नाही. एकमेव
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असल्याने अशा माणसांनी देशाचे नेतृत्व करावे असे माझे मत
झाले. त्यामुळे मी ममता बॅनर्जींना माझा पाठिंबा व्यक्त केला
आहे. हा पाठिंबा फक्त येत्या निवडणुकापर्यंतच असेल. त्यासाठी जनतेने अशा त्यागी नेतृत्वाचा विचार करावा असे मला वाटते.
मी माझे आयुष्य समाज आणि देश हितासाठीच अर्पण केलेले असल्याने ममता बॅनर्जींचे
विचार मला पटतात म्हणून मी पाठिंबा दिला आहे. देशामध्ये बदल व्हावा
या संबंधाने त्यांचे जे विचार आहेत ते आणखी महत्वाचे वाटतात. महात्मा गांधी म्हणत होत कि, देशाची अर्थ व्यवस्था बदलण्यासाठी
गाव हे घटक धरुन त्या गावातील जमिन आणि पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले,
कृषी उत्पन्न वाढवून त्या उत्पन्नावर आधारित उद्योग गावांमध्ये सुरु
केले आणि परदेशातील मार्केट मिळवून मार्केट चा प्रश्न सोडविला तर गावातील लोक शहरांकडे
धाव घेणार नाहीत. यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गावातच सुटू शकेस.
त्याच बरोबर देशाची अर्थ व्यवस्था बदलेल. खेड्यांची
अर्थव्यवस्था बदलली तर देशाची अर्थव्यवस्था आपोआपच बदलेल. महात्मा
गांधीजी म्हणत होते देशाची अर्थ व्यवस्था बदलण्यासाठी खेड्यांची अर्थ व्यवस्था बदलावी
लागेल. ममताजींचे हे विचार मला फारच प्रेरणादायी वाटतात.
आज स्वातंत्र्यानंतर आम्ही बाजारीकरणाची निती अवलंबवली त्यामुळे या देशाची
आर्थिक स्थिती डब घाईला आलेली आहे. बाजारनिती मुळे देशाची अर्थ
निती बदलणार नाही.
परदेशातील मोठ मोठ्या कंपन्यांना
आम्ही आमच्या देशात आणले. कंपन्यांना लागणारी जमिन शेतकऱ्यांकडून
जबरदस्तीने घेतल्या. नाही दिल्या तर डंडे चालविले, गोळ्या चालविल्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्यांना
देश धडीला लावले. यालाच आम्ही लोकशाही किंवा प्रजातंत्र म्हणणार
काय? आज देशातील नद्या, धरणे, जंगले या परकिय कंपऩ्यांना देण्याचा घाट या देशात घालण्यात आला. लोकशाही किंवा प्रजातंत्रामध्ये देशातील ठराविक काही उद्योगपती हा देश चालवितात
की काय? असा प्रश्न उभा राहिलेला आहे. अशा
अवस्थेत ममता बॅनर्जी चे विचार या देशाला तारु शकतील असे वाटते. भुगर्भ आणि भुपृष्ठावरील साधन संपत्तीचे शोषण करुन केलेला विकास हा खरा शाश्वत
विकास नव्हे. तर एक दिवस तो विनाश ठरेल. मी ममता बॅनर्जी या व्यक्तीला किंवा पार्टीला सपोर्ट केलेला नाही तर त्यांचे
सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीने जे विचार मला आवडले अशा विचारातुनच या देशाला उज्वल
भविष्य मिळु शकेल. अशी माझी धारणा झालेली असल्याने मी त्यांना
पाठींबा व्यक्त केलेला आहे. आज पर्यंत पक्ष आणि पार्ट्या फक्त
सत्ता परिवर्तनाचा विचार करीत आल्या आहेत. संपुर्ण व्यवस्था परिवर्तना
बाबत एकही पार्टी बोलत नाही. ममता बॅनर्जी तो विचार घेऊन कामकरतात
जे कामपश्चिमबंगाल मध्ये झाले ते कामदेशात झाले तर या देशाचे चित्र बदलेल असा मला विश्वास
वाटतो. फक्त सत्ता परिवर्तनातुन देश बदलणार नाही. हे स्पष्ट झालेले आहे. त्यासाठी संपुर्ण व्यवस्था परिवर्तनाचा
विचार होणे आवश्यक आहे. व्यवस्था परिवर्तनाचा विचार पक्ष आणि
पार्ट्यां मध्ये असता तर 17 मुद्द्या संबंधाने
त्या पार्ट्यांनी जनतेला सांगितले असते की आम्ही ह्या 17 मुद्द्यांची अंमलबजावणी करायला तयार आहोत पण, एका ही पक्ष
आणि पार्टी ने 17 मुद्दे संबंधाने पत्राला उत्तर दिले नाही.
अरविंद केजरीवालच्या हातात मी 17 मुद्द्यांचे पत्र दिले होते. ते मान्य केले तर ममता बॅनर्जी
प्रमाणे मी तुम्हाला ही सपोर्ट करायला तयार आहे. असे मी अरविंद
केजरीवाल यांना सांगितले होते. मात्र अद्याप पर्यंत त्यांनी
17 मुद्द्यांबाबत पत्र दिले नाही. याचा स्पष्ट अर्थ होतो कि, देशाचा विचार करण्या पेक्षा
तुम्ही सत्तेचा अधिक विचार करीत आहात, हे स्पष्ट होते.
अशा सत्तेमधुन देशाला उज्वल भविष्य मिळु शकणार नाही असे वाटते.
इतर पक्ष आणि पार्ट्या आणि तुमच्यामध्ये कोणताही फरक राहणार नाही असे
मला वाटते.
कि. बा.
तथा अण्णा हजारे
आदरणीय आण्णा ,ते १७ मुद्दे सर्वसामान्यांना समजले तर केजरीवाल आणि इतरांनी ते नाकारावेत असे त्यामध्ये काय आहे ते समजेल.
ReplyDelete