Wednesday, 22 April 2015

3 एप्रिल 2015 रोजी काढलेल्या भूमी अधिग्रहण अध्यादेशामध्ये बदल करण्याची गरज...

प्रति,
मा. नरेंद्र मोदी जी,
पंतप्रधान, भारत सरकार,
साऊथ ब्लॉक, राईसीना हिल,
नई दिल्ली 110011

3 एप्रिल 2015 रोजी काढलेल्या भूमी अधिग्रहण अध्यादेशामध्ये बदल करण्याची गरज...

इंग्रजांनी बनविलेला भूमी अधिग्रहण 1894 चा कायदा बदलून स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतर 2013 मध्ये देशातली शेतकऱ्यांच्या प्रदीर्ष संघर्षानंतर त्यावेळच्या सरकारने भूमी अधिग्रहण, पुनर्वसन आणि पुर्नस्थापना मध्ये पारदर्शकता आणि उचीत भरपाईच्या अधिकारा विषयीचा 2013 चा कायदा अस्तीत्वात आणला.  त्या कायद्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टींचा विचार करण्यात आला होता. परंतू नवीन सत्तेवर आलेल्या सरकारने 2013 च्या भूमी अधिग्रहण, पुर्नवसन आणि पुर्नस्थापना कायद्यात बदल करुन 31 डिसेंबर 2014 रोजी जो अध्यादेश काढला त्यात 2013 च्या भूमी अधिग्रहण कायद्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या असणाऱ्या तरतूंदीमध्ये बदल केला. केलेला बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्यामूळे देशातील अनेक स्वयंसेवी संस्था, शेतकरी संघटना, व इतर शेतकऱ्यांबद्दल आस्था असणाऱ्या विविध संस्था व संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. देशातील सर्व भागामध्ये या बदलाच्या विरोधात आंदोलने सुरु झाली. त्यामुळे सरकारने जनतेला असे आश्वासन दिले कि, हा कायदा शेतकरी विरोधी असेल तर आम्ही यामध्ये सुधारणा करू. आणि 3 एप्रिल 2015 रोजी सरकारने नविन अध्यादेश काढला. नवीन अध्यादेश जो काढला त्यामध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताच्या सुधारणा केल्या नाही. तो अध्यादेश शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याने देशभर सुरु झालेली आंदोलने अद्यापही चालू राहिली आहेत. हा अध्यादेश शेतकऱ्यांच्या हिताचा आहे असं सरकार वेळोवेळी देशातील जनतेला सांगत असल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे? की, शेतकऱ्यांच्या विरोधी आहे? याची वस्तुस्थिती आम्ही देशातील जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.
सध्य स्थितीत हा कायदा कसा शेतकरी विरोधी आहे याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे:

1)  अध्यादेशाद्वारे केलेला बदल27 सप्टेंबर 2013 च्या भुमीअधिग्रहण कायद्यामध्ये खाजगी कंपनी (Private Company) असा शब्द आहे त्यामध्ये या सरकारने त्याठिकाणी 3 एप्रिल 2015 च्या अध्यादेशाव्दारे खाजगी संस्था (Private Entity) असा शब्द वापरण्याची तरतूद करून 2013 च्या भुमीअधिग्रहण कायद्यात बदल केला आहे. असा बदल करण्याचा सरकारचा उद्देश काय होता?
शासनाचा हेतू - सरकारने हा केलेला बदल याला कारण म्हणजे खाजगी कंपनी हा शब्द कंपनी अक्ट 1956 च्या कायद्यामध्ये येतो त्यामूळे सरकारला कुठलीही जमीन सरकारला आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्याही कंपनी किंवा संस्थांना देता येत नाही हे लक्षात आल्यावर आणि सरकारला मोठ्या प्रमाणावर खाजगी संस्थांना जमिनी देण्याची इच्छा असल्याने या सरकारने खाजगी कंपनीच्या ऐवजी खाजगी संस्था (Private Entity) हा शब्द त्याठिकाणी समाविष्ट़ करुन खाजगी संस्थानासुध्दा जमीन अधिग्रहण करुन द्यायचा या सरकारचा हेतू स्पष्ट झालेला आहे. ज्यात प्रामुख्याने एकल संस्था, भागीदारी संस्था, कंपनी, कार्पोरेशन, सेवाभावी संस्था किंवा प्रचलित कायद्यान्वये स्थापित झालेल्या कोणत्याही अन्य संस्थांचा समावेश असु शकतो. वरील संस्थांना 2013 च्या कायद्यामधील खाजगी कंपनी या शब्दामुळे जमीन अधिग्रहण करुन देणे सरकारला शक्य़ नव्हते त्यामुळे सरकारने आपल्या जवळच्या लोकांची सोय करण्याच्या स्वार्थापोटी खाजगी कंपनी ऐवजी खाजगी संस्था हा शब्द त्याठिकाणी वापरुन 2013 च्या भुमीअधिग्रहण कायद्यात बदल केला. 3 एप्रिल 2015 च्या अध्यादेशाव्दारे या सरकारने जर खाजगी संस्था एखादा प्रकल्प उदा. शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स अशाप्रकारचे इतर कोणतेही उद्योग जर या संस्था उभे करु इच्छित असतील तर याव्दारे अशा उद्योगांना सरकार नवीन तरतूदी प्रंमाणे शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करुन देऊ शकते. त्यामुळे गरिब शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन अधिग्रहीत होऊ शकते व तो शेतकरी भुमिहीन होऊ शकतो. हा कायदा समाजातील धनदांडग्या व्यक्तींना व त्यांच्या संस्थांना फलदाई ठरणार आहे. असा निर्णय शेतकरी विरोधी आहे. या निर्णयामुळे सरकार आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या संस्थांची सोय करण्यासाठी तर असा बदल करु इच्छित नाही ना? अन्यथा खाजगी कंपनी (Private Company) ऐवजी खाजगी संस्था (Private Entity) असा बदल करण्याचे कारण काय?

2)  2013 भुमिअधिग्रहण मुख्यकायद्यातील विभाग 2 मधील उपविभाग (2) मध्ये दुसऱ्या तरतुदीनंतर खालील तरतुदींचा समावेश केला आहे. “कलम 10अ मध्ये उल्लेखीत प्रकल्पासाठी आणि त्यातील दिलेल्या उद्दिष्टांसाठी केलेले भूमि अधिग्रहण या उपविभागातील पहिल्या अटीतील तरतुदीनुसार वगळण्यात येईल.”
मुख्य कायदा 2 मधील उपविभाग (1) मध्ये दुसऱ्या तरतुदी नंतर केलेल्या तरतुदींच्या समावेशामुळे 10अ मध्ये उल्लेक केलेल्या प्रकल्पांना शेत मालकांच्या 80 टक्के पुर्वपरवानगीच्या अटीमधून वगळण्यात आले आहे.
      सरकारने अशा केलेल्या बदलांमूळे आता सरकार खाजगी संस्थांना, उद्योगपतींना शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय आपल्या मनमर्जी प्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करुन देऊ शकते. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या अधिकारावरच गदा येणार आहे. असा कायदा लोकशाही प्रक्रियेला मारक ठरणार असून शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.
      शेतकरी वर्षानुवर्षे ज्या जमिनीचा मालक आहे त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन त्या जमिनी उद्योगपतींना किंवा खाजगी संस्थांना देणे म्हणजे या सरकारची लोकशाही कडून हुकूमशाहीकडे वाटचाल चालली आहे. हे स्पष्टपणे दिसून येते. 10अ मध्ये उल्लेख केलेले प्रकल्पांना मालकांच्या 80 टक्के पुर्वपरवानगीच्या अटी मधून वगळण्यात आले ते प्रकल्प खालील प्रमाणे.
1)  भारत किंवा भारताच्या कुठल्याही भागाच्या संरक्षणासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्वाचे प्रकल्प ज्यात संरक्षणाची तयारी किंवा सामुग्रीच्या उत्पादनाचे प्रकल्प येऊ शकतात.
खाजगी संस्थांना सरक्षणाच्या सामुग्रीच्या उत्पादन प्रकल्पामध्ये सामावून घेतल्यास खाजगी संस्था संरक्षण सामुग्रीचा दुरुपयोग करु शकतात. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सरकार जो भारत किंवा भारताच्या कोणत्याही भागाच्या संरक्षणाचा विचार करत आहे तो साध्य होणे शक्य नाही. फक्त नफा कमविणाऱ्या खाजगी संस्थांना शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय जमिन अधिग्रहित करुन देणे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे.
खाजगी संस्थांना संरक्षणाच्या सामुग्रीच्या उत्पादन प्रकल्पमध्ये समावेश केले तर त्या संस्था आपल्या शत्रु राष्ट्राशी अमीषाला बळू पडून हातमिळवनी करु शकण्याचा धोका आहे. म्हणून ज्या वेळेला आपण अशा  उत्पादनाचा विचार करता त्यावेळी कायद्यामध्ये सर्वसाधारण खाजगी संस्था बाबत पुर्नविचार होणे आवश्यक आहे.
2)  विजपुरवठ्यासह अन्य ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा प्रकल्प.
-    या कायद्यामध्ये ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा प्रकल्पांची व्याख्या खुप विस्तीर्ण आहे आपण येथे फक्त मुलभूत सुविधा म्हटले आहे. यामधुन मुलभूत सुविधाची व्याख्याच स्पष्ट़ होत नाही. अशा सुविधा देताना कोणते उद्योग त्यामध्ये येतात याचा तपशिल दिलेला नाही. त्यामूळे फक्त सुविधा प्रकल्पाच्या नावाखाली अनेक उद्योगपती, अनेक खाजगी संस्था आपल्या मनासारखे कुठलेही उद्योग सुरु करतील आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमिन अधिग्रहित केली जाईल. त्यामूळे शेतकऱ्यांवर अन्याय होईल.
3)  गरीब जनतेसाठी घरे परवडणारे गृहप्रकल्प-
या कायद्यात परवडणारे गृहप्रकल्प असे म्हटले आहे. याची व्याख्या स्पष्ट होत नाही. अशा गृह प्रकल्पांच्या नावाखाली बांधकाम व्यवसायिक, भू-माफिया लोक मधे येऊन त्याचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत याची काय शाश्वती? आज अनेक शहरात अशा घटना घडत आहेत. यातून स्पष्टपणे दिसत आहे की, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या जमिनी विनापरवाना घेऊन बांधकाम व्यावसायिंका देण्याचा सरकारचा हा एक प्रकारचा डाव तर नाही ना? अशा धोरणांमुळे भू-माफिया शेतकऱ्याच्या जमिनी लुटण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी सरकारने सखोल अभ्यास करुन पाऊल उचलने गरजेचे आहे.
4)  संबंधीत सरकारे आणि त्यांच्या उद्योग संस्थांनी स्थापन केलेले औद्योगीक विभाग ज्यासाठी निर्धारित रेल्वेमार्ग किंवा रस्त्यांच्या दोन्ही बाजुस 1 कि.मी. पर्यंतची जागा ताब्यात घेतली जाईल.
या कायद्यतील केलेला हा बदल देशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने व लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याचा आहे. आपल्या देशात अंदाजित 62,000 कि.मी. रेल्वेमार्ग आहे. 92,000 कि.मी. राष्ट्रीय महामार्ग आहेत. 1,32,000 कि.मी. राज्य मार्ग आहेत. त्यामूळे किती लाख एकर जमिन अधिग्रहित केली जाणार आहे याचा अंदाज घेणे अवघड आहे.
स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत दुतर्फा वृक्ष लागवड केलेली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करुन वृक्ष वाढविले आहेत. या निर्णयामुळे ही सर्व वृक्ष तोडली जाणार आहेत. हे वृक्ष तुटली तर ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची आहे. एका बाजूला आपण औद्योगिक क्षेत्र वाढवत आहोत ते वाढल्यामूळे रोज लाखो टन पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसा यासारखे इंधन जाळत आहोत त्यातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड मुळे माणसांचे आजार वाढत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व तापमान दिवसेंदिवस वाढत आहे त्यामूळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. अशा अवस्थेत रस्त्याच्या दुतर्फा लावलेली लाखो झाडे तोडने हे चुकीचे आहे. आज लाखो एकर जमीन शेतकऱ्यांची परवानगी न घेता अधिग्रहित केली जाणार आहे हे लोकशाही विरोधी आहे. याचा अर्थ असा होतो की हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचे नाही. ते फक्त उद्योगपतींचा आणि आपल्या जवळच्या विविध संस्थांचा विचार करते.
5)  खाजगी-सरकारी भागीदारीच्या प्रकल्पासह सर्व मुलभूत सुविधा प्रकल्प आणि सामाजिक सुविधा प्रकल्प ज्यात जमिनीची मालकी सरकारकडेच राहते -
   परंतू अधिसुचना जारी करण्याआधी अशा प्रकल्पांसाठी संबंधीत सरकारने किमान आवश्यक जागा लक्षात घेऊनच भूमी अधिग्रहणाची व्याप्ती निश्चित केली पाहिजे. संबंधीत सरकारने नापिक जमीन, ओसाड जमीन इ. चे नियमाप्रमाणे सर्वेक्षण करुन नोंद करणे.
या कायद्यातील केलेला दल अस्पष्ट़च आहे. त्यात खाजगी-सरकारी, भागीदारी प्रकल्प म्हणजे कोणते प्रकल्प़ हे स्पष्ट़ होत नाही. मुलभूत सुविधा प्रकल्प म्हणजे कोणते मुलभूत सुविधा प्रकल्प हे स्पष्ट़ होत नाही. तसेच सामाजिक सुविधा प्रकल्पामध्ये कोणत्या प्रकल्पाचा समावेश होतो हे ही स्पष्ट़ नाही. म्हणून अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी त्यांची कसलीही व्याख्या स्पष्ट़ करता अशा प्रकल्पांना सामाजिक प्रभाव मुल्यमापनाच्या अभ्यासातुनही वगळून शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करणे हे पूर्णत: शेतकरी विरोधी आहे. ज्या वेळी कुठलाही कायदा होतो त्या कायद्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही स्पष्ट असायला हवी. कायद्यामध्ये स्पष्टीकरण नसेल तर प्रत्येक जण आप-आपल्या परिने त्याचा अर्थ लावतील आणि शेतकऱ्यांवर त्याचा खराब प्रभाव पडेल. म्हणून या प्रत्येक गोष्टीचे सरकारने स्पष्टीकरण करने आवश्यक आहे. खाजगी संस्थांना व उद्योगपतींना शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय वरील प्रकल्पासाठी सरकार जमिन अधिग्रहण करुन देऊ शकते. या कायद्यामुळे शेतकऱ्याच्या अधिकार स्वातंत्र्यावरच गदा येत आहे. लोकशाही प्रक्रियेला ते मारक आहे. या कायद्यात शेतकऱ्याचे हित कुठे आहे हे समजत नाही. ज्या वेळी सरकार म्हणते हा कायदा शेतकऱ्याच्या हिताचा आहे तर त्याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. सरकारने आणखीही असे म्हटले आहे की, नापीक जमिन व ओसाड जमिन इ. चे नियमाप्रमाणे सर्वेक्षण करुन नोंद करणे ही एक प्रकारची जनतेची दिशाभूल आहे. हे सर्व कशासाठी?
म्हणून देशातील जनतेची व आमची मागणी होती की, देशातील एकुण जमिनीचा सर्वे करावा व त्याचे क्लास 1/2/3/4/5/6 ग्रेड बनवावे. क्लास 1/2/3/4 ही जमिन औद्योगिक क्षेत्राला दिली जाणार नाही व क्लास 5/6 ची जमिन औद्योगिक क्षेत्रास दिली जाईल असा कायदा करणे आवश्यक आहे. जेणे करुन कृषी उत्पादन वाढेल व औद्योगिक उत्पादनही वाढेल आणि या देशाच्या विकासाला मदत होईल. दोन पेक्षा जास्त पिके (बहुपिके) ज्या जमिनीत निघतात अशा जमिनी सरकार घेण्याचा जो प्रयत्न करत आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. त्यामूळे देशातील कृषी उत्पादन घटेल. आज नव्हे तर कालांतराने अन्न-धान्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल. हे नाकारता येत नाही.

3)  मुख्यं कायद्यातील विभाग 3 कलम j पोटकलम i मध्ये
अ)   कंपनी कायदा 1956” हे शब्द आकडे बदलूनकंपनी कायदा 2013” हे शब्द आकडे घातले जातील.
ब)    कलम (वाय-y) नंतर खालील कलम घातले जाईल.
“(वाय-yy) खाजगी संस्था म्हणजे सरकारी संस्था किंवा उद्योग सोडून कुठलीही अन्य संस्था ज्यामध्ये एकल संस्था, भागीदारी संस्था, कंपनी, कार्पोरेशन, सेवाभावी संस्था किंवा प्रचलित कायद्यान्वये स्थापित झालेली कुठलीही अन्य संस्थांचा यात समावेश असु शकतो.
मुख्यं कायद्यातील विभाग 3 मध्ये, कलम (j) पोटकलम (i) मध्ये कंपनी कायदा 1956 हे शब्द आणि आकडे बदलून कंपनी कायदा 2013 हे शब्द व आकडे घालणे व कलम (वाय-y) नंतर खालील कलमांचा समावेश करणे.
“(वाय-yy) खाजगी संस्था म्हणजे सरकारी संस्था किंवा उद्योग सोडून कुठलीही अन्य संस्था ज्यामध्ये एकल संस्था, भागीदारी संस्था, कंपनी, कार्पोरेशन, सेवाभावी संस्था किंवा प्रचलित कायद्यान्वये स्थापित झालेली कुठलीही अन्य संस्थांचा यात समावेश असु शकतो.”
यातून असे स्पष्ट होते की, 2013 चा कंपनी कायदा लागू करुन सरकार अधिग्रहणाच्या प्रंक्रियेत जास्तीत जास्तं आपल्या जवळच्या संस्थांना समाविष्टं करु इच्छिते. Public private partnership मध्ये सरकार यांना भविष्यात विनापरवानगी प्रकल्प देऊ शकते. यातून असे स्पष्ट होते की, हा निर्णंय उद्योग क्षेत्राच्या खाजगी संस्थांच्या हितासाठी घेतला गेला आहे.

4) नवीन प्रकरण III-अ जोडणे
मुख्यं कायद्यामध्ये प्रकरण III नंतर खालील प्रकरण जोडले जाईल.
प्रकरण III-
प्रकरण II व प्रमाण III मधील तरतुदी कांही विशिष्टं प्रकल्पांना लागू होणार नाहीत.
(संबंधीत सरकारला विशिष्टं प्रकल्प वगळण्याचा अधिकार)
10सार्वजनिक हिताच्या दृष्टीने संबंधित सरकार या कायद्याच्या प्रकरण II III मधील तरतुदी लागु करण्यातून खालीलपैकी कुठलेही प्रकल्प वगळु शकते:

5) विभाग 87 ऐवजी नविन विभाग 87:
मुख्य कायद्यात विभाग 87 खालील प्रमाणे बदलला जाईल:
87. जर या कायद्यानुसार अशा प्रकारचा गुन्हा घडतेवेळी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरीला असलेल्या अथवा पुर्वी नोकरीला असलेल्या व्यक्तीकडून असा गुन्हा झाला असेल तर, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसीजर च्या कलम 197 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार संबंधीत सरकारची पुर्वसंमती असेल तरच कोर्ट अशा गुन्ह्यांची दखल घेईल.
      मुख्य कायद्यात विभाग 87 ऐवजी नविन विभाग 87 जो जोडलेला आहे हा विभाग व त्यातील तरतूद ही पूर्ण़पणे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे दिसून येते.
जर एखाद्या बाधित शेतकऱ्यास केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरीला असलेल्या अथवा पुर्वी नोकरीला असलेल्या व्यक्तीबाबत तक्रार नोंदवायची असल्यास संबंधीत शासनाच्या परवानगीशिवाय न्यायालयाला तशा तक्रारीची दखल घेता येणार नाही. ज्याच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे त्याच्याच परवानगीने ही तक्रार नोंदविणे कशे शक्य़ आहे? अधिग्रहण प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकारी हा प्रमुख निर्णय अधिकारी आहे त्याच्याच विरोधात संबंधीत तक्रारकर्ता न्यायालयात कशी तक्रार करु शकेल? हा निर्णय म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे.   

6)  विभाग 101 मधील सुधारणा :
मुख्य कायद्यात कलम 101 मध्येपाच वर्षाचा कालावधीऐवजी खालील शब्द घालावेतकुठल्याही प्रकल्प स्थापनेसाठी निर्धारीत केलेला कालावधी किंवा जास्तीत जास्त पाच वर्षेयातील नंतरचा / जास्तीचा जो असेल तो.
मुख्य कायद्यात कलम 101 मध्येपाच वर्षाचा कालावधीऐवजीकुठल्याही प्रकल्प स्थापनेसाठी निर्धारीत केलेला कालावधी किंवा जास्तीत जास्त पाच वर्षेहे वापरण्यात आले आहे.
यातून असे निर्देशित होते की, निर्धारित केलेला कालावधी बाबतचा बदल हा शेतकरी विरोधी आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी या जास्तीतजास्त़ कालावधीसाठी शासनाकडे / उद्योगक्षेत्राकडे कशा राहील याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे हा कालावधी पाच वर्षेच असला पाहिजे. सदर कालावधीत प्रकल्प़ स्थापित झाल्यास सदर अधिग्रहीत जमीन संबंधीत जमीन मालकास किंवा त्याच्या वारसदारास तात्काळ परत केली जावी.

7)  कलम 113 मधील सुधारणा :
मुख्य कायदा कलम 113 उपकलम (1) मध्ये
अ) ह्या भागातील तरतुदीहे शब्द काढून तिथेह्या कायद्यातील तरतुदीहे शब्द  घालावेत.
ब) दिलेल्या अटीमध्येदोन वर्षाचा कालावधीऐवजीपाच वर्षाचा कालावधीहे शब्द घालावेत.
ह्या भागातील तरतुदीऐवजीह्या कायद्यातील तरतुदीहे शब्द वापरुन शासनाने या कायद्यातील त्यांच्याकडे असलेल्या अधिकारात वाढच केलेली आहे. समजा जमीन अधिग्रहणामध्ये जर काही वाद निर्माण झाला तर शेतकऱ्यास पाच वर्ष़ वाट पहावी लागेल त्यामुळे पाच वर्षाऐवजी दोन वर्षाचाच कालावधीच योग्य़़ आहे म्ह़णून हा बदलसुध्दा शेतकरी विरोधातीलच असल्याचे दिसून येते.
एका बाजुला सरकार जरी असे म्हणत असेल हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे पण वरील उदाहरणांवरुन हे लक्षात येते की हा कायदा कसा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. या अध्यादेशाचे जर कायद्यात रुपांतर झाले तर देशातील अन्नदात्या शेतकऱ्यांचे पिढ्या पिढ्याचे नुकसान होईल. त्याचबरोबर देशातील अन्नधान्य उत्पादनावर फार मोठ्या प्रमावर परिणाम होईल. असा कायदा लागू झाला तर देशातील शेतकऱ्यांसहीत सर्व जनतेमध्ये सरकारच्या विरोधा असंतोष निर्माण होईल. देशाच्या पर्यावरणावर घातक परिणाम होईल. पर्यावरणाचे संतूलन ढासळल्यामुळे देशात काही भागात दुष्काळ काही भागात अवकाळी पाऊस यासारख्या घटनांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल. म्हणून आज देशात भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात सुरु असलेले आंदोलने हे कुठल्याही पक्ष पार्टी व्यक्ती च्या विरोधात नसून शेतकरी, समाज, राज्य, राष्ट्रहिताच्या प्रश्नासाठी हे आंदोलन चालू असल्याने सरकारला विनंती आहे की भूमी अर्जन पुनर्वास और पुनर्व्यवस्थापन मध्ये उचित प्रकार आणि पारदर्शिका अधिकार (संशोधन) विधेयक 2015 हे शेतकऱ्यांसाठी कशे अन्याय कारक आहे. हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आमच्या लिहण्यामध्ये काही उणिवा असतील तर आपण आम्हाला उलट टपाली पत्र पाठवून कळवावे. जेणे करुन आंदोलकांची चुक कळू शकेल. उणिवा नसतील तर सरकारने या विधेयकामध्ये बदल करुन शेतकऱ्यांच्या हिताचे विधेयक आणावे ही विनंती.
सरकार वेळोवेळी म्हणत आहे की, भूमी अधिग्रहण अधिनियम शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. पण वरील तरतुदी पाहिल्यानंतर असे वाटत आहे की, हा अधिनियम पुर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामूळे या अधिनियमाचा पुर्णपणे गंभीरतापूर्वक अभ्यास करुन वरील मुद्दे उपस्थित केले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हिताबाबत सरकारचे म्हणणे खरे आहे की, आम्ही उपस्मुथित केलेले मुद्दे हे जनतेच्या समोर स्पष्ट हेणे जरुरी आहे. त्यामूळे या पत्राचे उत्तर व सरकारचे मत आम्हाला 25 एप्रिल पर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे.
धन्यवाद.
    आपला,


                 कि. बा. तथा अण्णा हजारे

No comments:

Post a Comment