Sunday 30 March 2014

देशातील वाढत्या भ्रष्टाचार, गुंडगिरी, लूट, दहशतवादादास राजकीय पक्ष जबाबदार...

स्वातंत्र्याच्या 66 वर्षात देशात लोकांची लोकांनी लोक सहभागातून चालविलेली लोकशाही आली नाही. त्यासाठी जनतेला स्वातंत्र्याची दुसरी लढाई समजून ती लढावी लागणार...
     स्वातंत्र्याच्या 66 वर्षानंतर ही देशात भ्रष्टाचार, गुंडगिरी, लूट, दहशतवाद वाढतो आहे
याला काही पक्ष आणि पार्ट्या जबाबदार आहेत.
          
      भारताच्या घटनेमध्ये पक्ष आणि पार्ट्यांचे नावच नाही. घटनेमध्ये म्हटले आहे भारतामधील कोणताही नागरीक ज्याचे वय 18 वर्ष पुर्ण झाले आहे असा नागरीक वैयक्तीक निवडणूक लढवू शकतो. संविधानात पक्ष आणि पार्ट्यांच्या समूहाने निवडणूका लढवावी असे कुठेही म्हटलेले नाही, जाणकार अभ्यासु माणसांनी ते तपासून पहावे. 1857 पासुन 1947 पर्यंत नव्वद वर्षे स्वातंत्र्याची लढाई चालत राहिली. शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु सारख्या लाखो शहिदांनी या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले त्यांचे स्वप्न होते की, इंग्रजांना या देशातुन घालवायचे आणि देशात लोकांची, लोकांनी लोकसहभागातुन चालविलेली लोकशाही आणायची.
     1947 साली इंग्रज आपल्या देशातुन गेला मात्र लोकशाही यायला हवी होती, ती लोकशाही देशात आली नाही. पक्ष आणि पार्टीशाहीने लोकशाहीला देशात येऊच दिले नाही. 1947 साली जुलमी इंग्रज गेला आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र स्वातंत्र्याच्या 66 वर्षानंतर ही प्रश्न उभा आहे की, कुणाला मिळाल स्वातंत्र्य? जनतेला काय स्वातंत्र्य मिळाल? इंग्रजांप्रमाणे तीच लुट, तीच गुंडगिरी, तीच दहशत, तोच भ्रष्टाचार, व्यभीचार. इंग्रजांनी 150 वर्षात या देशाला लुटल नसेल त्यापेक्षा अधिक लुट आमचीच माणस पक्ष आणि पार्ट्यांच्या माध्यमातुन करीत आहेत. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1949 साली आमची घटना तयार झाली. त्या घटनेमध्ये पक्ष आणि पार्ट्यांचे नाव कुठेही आलेल नाही. लोकतांत्रिक गणराज्याचा विचार झाला आहे. भारतात राहणारा 18 वर्ष वय झालेला कोणताही नागरीक निवडणूका लढऊ शकतो, अस घटनेने म्हटले आहे. पक्ष आणि पार्ट्यांच्या समूहाचा उल्लेख नाही. 26 जानेवारी 1950 साली देशात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. प्रजा या देशाची मालक झाली. ज्या दिवशी जनता या देशाची मालक झाली त्याच दिवशी देशातील सर्व पक्ष आणि पाटर्या बरखास्त व्हायला हव्या होत्या. महात्मा गांधीजींनी कॉंग्रेस वाल्यांना सांगितले होते कि, देशात लोकशाही आली, जनता देशाची मालक झाली, आता पक्ष आणि पार्ट्यांची आवश्यकता नाही म्हणुन काँग्रेस पार्टी बरखास्त करा. आता भारतामधील कोणताही नागरीक निवडणूका लढऊ शकेल. जनतेने अशा चारित्र्यशील उमेदवारालाच निवडूण संसदेमध्ये पाठवायला हवे. मात्र 1952 मध्ये देशात पहिली निवडणूक जाहीर झाली. पक्ष आणि पार्ट्यां बरखास्त तर झाल्या नाहीत मात्र पक्ष आणि पार्ट्यांनी घटनाबाह्य निवडणूका जाहीर केल्या. त्या वेळेच्या निवडणूक आयोगाने पक्ष आणि पार्ट्यांना निवडणूकी पासुन रोखणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही आणि घटनाबाह्य निवडणूका होऊन पक्ष आणि पार्ट्यांचे काही उमेदवार निवडूण आले. 1952 पासुन आजपर्यंत देशामध्ये घटनाबाह्य निवडणूका होत आहेत. अशा पक्ष आणि पार्ट्यांच्या निवडणूका मुळे संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर ही ताकदवार गट तयार झाले. त्यामुळे संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर ही पक्ष आणि पार्ट्यांची गुंडगिरी वाढत गेली, लुट वाढत गेली, भ्रष्टाचार वाढत गेला, महागाई वाढत गेली. 1857 ते 1947 ज्या लाखो शहीदांनी देशात लोकशाही आणण्याच स्वप्न पाहिल होत ते त्यांच स्वप्न या काही पक्ष आणि पार्ट्यांच्या समूहाने धुळीला मिळविले. स्वातंत्र्याच्या 66 वर्षात त्या लोकशाहीला पक्ष आणि पार्टी शाहीनी नेस्तनाबूत करुन टाकल आहे. कुठे आहे ती लोकांची लोकांनी लोकसहभागातुन चालविलेली लोकशाही
      ज्या संसदेत आम्ही लोकसभा म्हणतो म्हणजे ती लोकांची सभा असायला हवी होती. वैयक्तीक उमेदवाराला जनतेने निवडूण पाठविले असते. तर ती खर्या अर्थाने लोकसभा झाली असती. मात्र आज त्या सभेमध्ये पक्ष आणि पार्ट्यांचे उमेदवार गेल्यामुळे ती पक्ष आणि पार्ट्यांची सभा झालेली आहे. ती लोकांची सभा राहिलेली नाही. संसद पक्ष आणि पार्ट्यांची झाल्याने प्रत्येक पक्ष आणि पार्ट्यां मध्ये सत्ता स्पर्धा सुरु झाल्या. येन केन प्रकारे निवडूण यायचे एवढेच ध्येय धोरण असल्याने बर्याच पक्ष आणि पार्ट्यां गुंड, भ्रष्टाचारी, लुटारु, व्यभीचारी अशा लोकांना ही निवडणूकीचे तिकिट देऊ लागल्या त्यामुळे विधानसभा, लोकसभा सारख्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये गुंड, भ्रष्टाचारी, लुटारु, शिरु लागले. आज काही पक्ष आणि पार्ट्या सत्तेमधुन पैसा आणि पैशामधुन सत्ता या भोवतीच पिंगा घालताना दिसतात. पक्ष आणि पार्ट्यांनी सत्ता आणि पैशांच्या अभिलेखा पायी भ्रष्टाचारी, गुंड, लुटारु उमेदवाराला तिकीट देऊन चुक केली असली तरी ती चुक दुरुस्त करण्याची चावी मतदारांच्या हातात आहे. मतदारांनी भारत मातेची शपथ घेऊन प्रतिज्ञा करायला हवी की पक्ष आणि पार्ट्यांनी जरी भ्रष्टाचारी, गुंड, लुटारु उमेदवाराला तिकिट दिले असले तरी मी अशा उमेदवाराला माझे मत देणार नाही. जो पक्ष आणि पार्टी विरहीत जनतेचा उमेदवार उभा आहे अशाच उमेदवाराला मी माझे मत देईल. मतदारांनी अशी प्रतिज्ञा केली तर भ्रष्टाचारी, गुंड, लुटारु उमेदवार संसदेमध्ये जाणार नाहीत. पक्ष आणि पार्ट्यांचे समूह संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर ही झाल्याने संसदेमध्ये आणि बाहेर ही मारामार्या भांडणे होताना दिसतात. जनतेचा वैयक्तीक उमेदवार संसदेत गेला असता तर संसदेमध्ये मारामार्या झाल्या नसत्या. संसदेमध्ये भ्रष्टाचारी, गुंड, लुटारु लोक गेल्यामुळेच देशात भ्रष्टाचार वाढत गेला कारण भ्रष्टाचाराला आळा घालाणारे सशक्त कायदे करायला हवे होते ते होत नाहीत. महात्मा गांधी म्हणत होत देश बदलण्यासाठी गावांचा विकास होणे आवश्यक आहे. मात्र आज देशातील प्रत्येक गावात पक्ष आणि पार्ट्यांच्या समूहाने आप आपल्या पक्ष आणि पार्ट्यांचे गट तयार झाल्याने गावा गावात भांडणे सुरु होऊन विकास कामांना खिळ बसली आहे. खेड्यांचा विकास ठप्प झालेला आहे. युवाशक्ती ही आमच्या देशाची राष्ट्रशक्ती आहे. ती राष्ट्रीय कार्याकडे वळविली तर समाज आणि देशाचे उज्वल भवितव्य दुर नाही. मात्र आज महाविद्यालयीन युवकामध्ये पक्ष आणि पार्ट्यांच्या समूहाने युवकामध्ये गट निर्माण करुन आप आपसात भांडणे लावून दिल्यामुळे युवाशक्ती जी राष्ट्रीय विकासाकडे वळवायला हवी होती ती शक्ती आप आपापसातील भांडणांकडे वळविली गेली. देशामध्ये जाती-पाती, धर्म, वंश यांचे विष या पक्ष आणि पार्ट्यांनी पेरले आहे. त्यामुळे देशात आप आपसात जाती पातीचे भांडणे होत आहेत. आज जनतेचा पैसा मेडिकल, इंजिनियरींग, लॉ सारख्या शिक्षणावर खर्च होत आहे. ही सर्व महाविद्यालये पक्ष आणि पार्ट्यांच्या समूहाने आप आपसात वाटून घेतले आहेत आणि दुकाने लावून बसली आहेत. लाखो रुपये डोनेशन घेऊन प्रवेश दिला जातो. यामुळे गरीब माणूस उच्चशिक्ष़ा कशी घेणार?
        बोफर्स, टू जी स्पेक्टम, आदर्श सोसायटी, हेलिकॅप्टर घोटाळे, कोळसा घोटळा सारखे कोट्यावधी रुपयांचे घोटाळे झाले याला कारण पक्ष आणि पार्ट्यांचे समूहामुळे झाले आहेत. जनतेचा चारित्र्यशिल माणूस निवडूण संसदेमध्ये गेला असते तर अशा प्रकारचे घोटाळे झाले नसते. देशामध्ये विकास कामांचे जे ठेके दिले जातात ते मोठ्या प्रमाणावर या पक्ष आणि पार्ट्यांच्या समूहाला दिले जातात. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे घोटाळे होतात. या सर्वामध्ये जनतेने ठरविले तर जनता बदल घडवून आ़णू शकते कारण बदल घडवून आणण्याची चावी देशातील मतदारांच्या हातात आहे. मतदारांनी आपल्या मतदानाचा हकक आवश्य बजवायला हवा. मात्र मतदारांनी भारत मातेची शपथ घेऊन प्रतिज्ञा करायला हवी की मी कोणतीही लाच न घेता मी माझे मत फक्त चारित्र्यशील माणसालाच देईल. भ्रष्टाचारी, गुंड, लुटारु अशा उमेदवारालाा मी माझे मत देणार नाही. अशी प्रतिज्ञा करुन मतदारांनी मतदान केले तर पुढील पाच वर्षात किंवा दहा वर्षात या देशातील पक्ष आणि पार्टीतंत्र नेस्तनाबूत होऊन देशात लोकांची, लोकांनी लोकसहभागातून चालविलेली लोकशाही येऊ शकेल. बलशाली भारताचे स्वप्न साकार होऊ शकेल. 2014 च्या निवडणूकीमध्ये होणे शक्य होणार नाही. कारण पक्ष आणि पार्ट्या प्रत्येक मतदारांच्या डोक्याक फिट बसले आहे. दोन सख्खे भाऊ दोन पार्ट्यांचे आहेत. अलीकडे तर बाप आणि मुलगा वेगवेगळ्या पार्ट्यांचे आहेत. अशा अवस्थेत पक्ष आणि पार्टीतंत्र नेस्तनाबूत होणे सोपे नाही. मात्र पुढील पाच वर्ष, दहा वर्ष, बारा वर्ष काही कार्यकर्त्यांनी देशभर लोकशिक्षण, लोकजागृतीचे कार्य केले तर एक दिवस येईल की पक्ष आणि पार्टीतंत्र नेस्तनाबूत होऊन या देशात लोकशाही येईल. जोपर्यंत लोकशाही येणार नाही तो पर्यंत ज्यांनी बलिदान केले त्यांचे स्वप्न पुर्ण होणार नाही. स्वातंत्र्याची दुसरी लढाई समजुन 23 मार्च 2014 रोजी आम्ही शहिद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना फासी देण्यात आली त्या हुसेनीवाला, फिरोजपुर येथील समाधी येथे 500 तरुण एकत्र येऊन प्रतिज्ञा केली आहे की, देशात लोकशाही यावी यासाठी तुम्ही जे बलिदान केले ते तुमचे स्वप्न पुर्ण करण्याचा आम्हा प्रयत्न करत राहू त्यासाठी आम्हाला बलिदान करावे लागले तर ते आम्ही करु. देशाच्या प्रत्येक राज्यात लोकशिक्षण,                  लोकजागृती त्यातून लोकसंघटन उभे करण्यासाठी राष्ट्रीय स्थरावर एक संघटन उभे करण्याचा प्रयत्न करण्याचे देशातील काही लोकांनी एकत्र येवून ठरविले आहे. 2014 च्या निवडणूकी नंतर आम्ही त्या संघटनेचे नाव जाहीर करु. देशातील सहाशे जिल्ह्यात हे संघटन उभे करण्याचा प्रयत्न होणार असून 2 ते 3 वर्षात कन्याकुमारी ते काश्मीर एक पदयात्रा काढण्याचा विचार झालेला आहे. 2019 पर्यंत किती सफलता मिळते हे पाहून 2024 पर्यंत पुन्हा प्रयत्न करत राहाणार आहे. कोणताही पक्ष आणि पार्टीचा विचार नाही. फक्त जनतेने उभे केलेले चारित्र्यशील उमेदवार जे पक्ष आणि पार्टी विरहीत आहेत अशा जनतेच्या उमेदवारांना संसदेमध्ये कशे पाठविता येईल जेणेकरुन देशात लोकशाही, जी लोकांची, लोकांनी लोक सहभागातून चालविलेली शाही आणता येईल एवढाच प्रयत्न रहाणार आहे. स्वातंत्र्याची दुसरी लढाई समजून या चळवळी मध्ये कोणताही अपेक्षा न ठेवता चारित्र्यशील लोकांनी सहभागी व्हावे
आपला, 

कि.बा.तथा अण्णा हजारे 

पत्र व्यवहाराचा पत्ताः
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास
मु.पो.राळेगण सिद्धी, ता. पारनेर,
जि. अहमदनगर, महाराष्ट्र 414302
फोन. 02488-240401, 240581.



No comments:

Post a Comment